एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

दोन महापुरुषांची भेट

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या भेटीचे प्रसंग

प्रसंग पहिला -

ही घटना १४ जुलै १९४९ रोजी दादार येथे घडलेली आहे. गाडगेबाबांना पंढरपूर येथील चोखामेळा धर्मशाळा डॉ.बाबासाहेबांकडे सोपवायची होती. परंतु त्यावेळी गाडगेबाबांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे कागदपत्रे पूर्ण होऊनही बाबासाहेबांना देणे शक्य होत नव्हते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी भारताचे कायदेमंत्री होते. त्याचप्रमाणे ते भारताचे संविधान लिहिण्यात व्यग्र होते. त्यांना मुंबईहून दिल्लीला सायंकाळी जायचे होते. त्याचवेळी गाडगेबाबांचे सहकारे महानंद स्वामी डॉ.बाबासाहेबांकडे येऊन म्हणाले की, गाडगेबाबा मुंबईत असून त्यांची तब्येत बरी नाही.
डॉ.बाबासाहेबांनी दिवसभराचे कार्यक्रम रद्द करून तडक गाडगेबाबांना भेटण्यासाठी निघाले. गाडगेबाबा कोणत्याही प्रकारची वस्तू भेट म्हणून स्वीकारीत नव्हते. तरीही
डॉ.बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी दोन घोंगड्या घेतल्या.
डॉ.बाबासाहेब भेटीला आलेत हे समजताच गाडगेबाबा अंथरुणावरुन उठून बसले व म्हणाले, ‘आपण कशाला आले,बाप्पा. आपले एकेक मिनिट लाखमोलाचे. आम्ही फकीर.आपला केवढा अधिकार?’ त्यावर डॉ.बाबासाहेब गहिवरून
आले व म्हणाले, ‘बाबा आमचा अधिकार दोन दिवसाचा.
उद्या खुर्चीवरून उतरलो की आम्ही कोण? आपला अधिकार अजरामर आहे. तो आपण अतिशय कष्ट करून मिळविला आहे .
लोक आपल्याला विनाकारण मानीत
नाहीत. आपण आपली योग्यता कसोटीवर घासून सिद्ध केली आहे. ती योग्यता, तो अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही. 
आपल्याला बरे नाही असे कळताच आपल्या भेटीला धावतच आलो. आपण दुसरे काही स्वीकारणार नाही. म्हणून या दोन घोंगड्या आपणासाठी आणल्या आहेत. 
चोखामेळा धर्मशाळेच्या हस्तांतराची कागदपत्रे आणली आहेत. त्यावर गाडगेबाबांनी अंगठा उमटविला व डॉ.बाबासाहेबांकडे दिलीत. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील व रावबहादुर जगताप हे सुध्दा गाडगेबाबांना भेटण्यासाठी आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा