एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

व्‍यवहारज्ञानाचे धडे

एका शहरात दररोज संध्‍याकाळी एक महात्‍मा प्रवचन देत असे. त्‍यांची ख्‍याती एका धान्‍याच्‍या व्‍यापा-यानेही ऐकली होती.

तो आपल्‍या मुलासोबत प्रवचन ऐकण्‍यास आला. प्रवचन सुरु झाल्‍यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते.
काही ज्ञानाच्‍या गोष्‍टी सां‍गत असताना ते म्‍हणाले,

*''या जगात जितके प्राणी आहेत. त्‍या सर्वांमध्‍ये आत्‍मा वावरत असतो.''*

ही गोष्‍ट व्‍यापा-याच्‍या मुलाला हृदयस्‍पर्शी वाटली.
त्‍याने मनोमन हा विचार आचरणात आणण्‍याचा संकल्‍प केला. दुस-या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्‍हा त्‍याच्‍या वडिलांनी त्‍याला काही वेळ दुकान सांभाळण्‍यास सांगितले. ते स्‍वत: दुस-या कामासाठी बाहेर निघून गेले. त्‍यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्‍य खाऊ लागली. मुलाने त्‍या गायीला हाकलण्‍यासाठी लाकूड उचलले पण त्‍याच्‍या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे.
मग भेदभाव का मानायचा?
ती धान्‍य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात व्‍यापारी तेथे आले त्‍याने गायीला धान्‍य खाताना पाहून मुलाला म्‍हणाले,
'' अरे तुझ्यासमोर ती गाय धान्‍य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्‍यासारखा गप्‍प बसून का आहेस?
आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्‍पना आहे की नाही? तिला हाकलून का दिले नाहीस?'' मुलगा म्‍हणाला,'' बाबा, काल तर महाराज म्‍हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्‍ये पण एक जीव पाहिला'' तेव्‍हा व्‍यापारी म्‍हणाले,''मूर्खा, अध्‍यात्‍म आणि व्‍यापार यात गल्‍लत एकसारखे करायची नसते.''

तात्‍पर्य :-
सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्‍यास जीवन सुखदायी होते.