एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे

#घे_भरारी... 

........ एका यशोगाथेची कथा. 

....... 

नाव कल्पना सरोज. रा: रोपरखेडा ता: मूर्तिजापूर. जिल्हा: अकोला. 
वडील पोलीस कॉन्स्टेबल. महिना तीनशे रुपये पगार. त्यात तीन बहिणी, दोन भाऊ, आई, आजी आजोबा, काका काकी एवढा परिवार. 
एका सडकेचं गाव. गावात वीज नाही. शाळेतून येताना शेण वेचत यायचं, घरी आल्यावर गोवऱ्या थापायच्या. सुट्टी दिवशी सरपण गोळा करायचं, शेतमजूरीच्या कामावर जायचं. दलित म्हणून शाळेतही उपेक्षित. कशीबशी सातवीपर्यंत शिकली. बाराव्या वर्षी लग्नाचं स्थळ आलं. समाजाच्या दबावापोटी वडिलांना लग्न लावून द्यावं लागलं. दुप्पट वयाचा नवरा. मुंबईचं सासर.

सासरी छळ होवू लागला. तरीही त्रास सहन करत ही तशीच राहत होती. एकदा वडील भेटायला आले. पोरीची पार दशा दशा झाली होती. वडिलांना रहावलं नाही. त्यांनी तिला घरी आणलं.

 "नवरा सोडून घरी राहतेय, ही रीत नाही." 
समाज नावं ठेवू लागला.

 इथंही उपेक्षा सुरू झाली. मुलीने पुढे शिकावे अशी वडिलांची इच्छा पण लोकांनी टोमणे मारून तिला बेजार केलं. सगळं असह्य झालं. घरात ढेकूण मारण्याच्या तीन बाटल्या शिल्लक होत्या. आजीची नजर चुकवून तिने तीनही बाटल्या पिवून टाकल्या. आजी चहा घेऊन दारात आली तर हिच्या तोंडाला फेस आलेला. धावपळ केली, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पोरीचा जीव वाचला.

"जगू पाहतेय तर माणसं जगू देत नाहीत अन मरु पाहतेय तर मरुही देत नाहीत." 

मुंबईला एक काका होता. ही त्याच्याकडे आली. शिलाई मशीनचं जुजबी काम शिकलेली. काकाने एका गारमेंट फॅक्टरीमध्ये हिला कामाला लावलं. पण मशीनवर शिलाईकाम येईना म्हणून मग हिला धागे कापायचे काम दिले. पगार होता दिवसाला दोन रुपये. थोडसं बरं चाललं होतं तर वडिलांची नोकरी गेली. सगळे मुंबईला आले. स्वतःची शिलाई मशिन घेवून घरी ही सोळा सोळा तास काम करू लागली. अशातच बहिणीला कॅन्सर झाला होता, तिचा औषधाअभावी मृत्यू झाला.

" पैसा असेल तरच माणूस जगवता येईल" 
हे अटळ सत्य आ वासून समोर होते.

स्वतःचा बिझनेस हवा, तरच पैसा कमावता येईल. एक माणूस होता. तो लोकांना सरकारी योजनेतून कर्ज मिळवून द्यायचा. हिने त्याच्याकडे अनेक खेटे घातले. 
पण "
पन्नास हजार कर्ज हवे असेल तर दहा हजार वाटावे लागतील, "
त्याने मार्ग दाखवला. तिने नकार दिला. शासकीय योजना समजून घेतल्या. स्वतःच्या हिमतीवर महात्मा फुले योजनेतून तिने पन्नास हजार कर्ज मिळवले. स्वतःचे बुटीक टाकले, छोटंसं फर्निचरचं दुकानही टाकलं.

आपल्यासारखे अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनाही मार्ग दाखवायला हवा, या विचाराने तिने सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना काढली. शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू झालं. जनमानसात एक ओळख निर्माण झाली. फर्निचर व्यवसाय चांगला चालला होता. एका फर्निचर व्यापाऱ्याशी हिचं दुसरं लग्नही झालं पण हे लग्नसुद्धा सुख देवू शकलं नाही. पदरात एक मुलगा व एक मुलगी टाकून नवरा मृत्यू पावला.

आता चार पैसे हातात येत होते. एक माणूस तिच्याकडे आला. त्याचा स्वतःचा एक प्लॉट होता तो त्याने हिला अडीच लाखाला देवू केला. पण हिच्याकडे एवढे पैसे नव्हते. कशीबशी एक लाखाची जुळणी करुन राहिलेले पैसे नंतर देण्याच्या बोलीवर हा व्यवहार झाला. तिने काही दिवसांनी सगळे पैसे फेडले. ताबा घ्यायला गेल्यावर कळालं की हा प्लॉट वादग्रस्त आहे. अनेक वर्षे घालवून, कोर्टाच्या अनेक चकरा मारुन हिने सगळे वाद मिटवले. अडीच लाखाच्या प्लॉटची किंमत पन्नास लाखावर गेली. हिने त्या जागेवर स्वतःचे कन्स्ट्रक्शन सुरू करण्याचा निश्चय केला.
झालं एक महिला, त्यातही बुद्धिस्ट महिला, ती बांधकाम व्यवसायात उतरणार म्हणल्यावर बिल्डर लॉबी अस्वस्थ झाली. एका बिल्डरने तिच्या खूनाची सुपारी दिली. ही बातचीत एका इसमाने ऐकली. त्याने सगळी कहाणी तिच्या कानावर घातली. तिला गावी निघून जाण्याचा सल्ला दिला. पण आता मरणाची भितीच उरली नव्हती. त्यावेळी ठाण्याचे पोलीस कमिशनर भुजंगराव मोहिते होते. हिने त्यांना सगळी कहाणी सांगितली. त्यांनी तपासाचे आदेश दिले. धरपकड झाली दुर्घटना टळली.

" तुम्ही आता या क्षेत्रात येतच आहात तर मग तुम्ही पोलीस संरक्षण का घेत नाही ?" कमिशनर म्हणाले. 

" साहेब पोलीस संरक्षणात मी किती दिवस राहणार ? तुम्हाला जर काही द्यायचे असेल तर मला रिवॉलव्हरचे लायसन्स द्या..." कल्पना म्हणाली. 
अश्चर्य म्हणजे फक्त पाच सहा तासातच तिला रिवॉलव्हरचे लायसन्स मिळाले. 

एका सिंधी पार्टनरला घेऊन ६५ - ३५ टक्केवारी मध्ये हे कन्स्ट्रक्शन पूर्ण झाले तेंव्हा या प्लॉटचे तिला साडेचार कोटी रुपये मिळाले. 
बांधकाम व्यवसाय वाढू लागला पण शत्रूही वाढले.

 पण "जोपर्यंत आपल्या रिवॉलव्हर मध्ये सहा गोळ्या आहेत तो पर्यंत आपण मरु शकत नाही." अशी ठाम भूमिका घेवून बेडरपणे कल्पना आव्हानाला सामोरी जात राहिली. 

एकेदिवशी कमानी ट्युबज कंपनीचे काही कामगार तिच्याकडे आले. 

"ही कंपनी तुम्ही टेक ओव्हर करा." अशी त्यांनी विनंती केली.
 एक नवीनच आव्हान समोर आलं होतं. तिने चौकशी केली. 
१९६० मध्ये ही कंपनी सुरू झाली होती. १९८५ मध्ये कामगार आणि मॅनेजमेंट मध्ये वाद झाले. कंपनी बंद पडली. १९८८ साली सुप्रिम कोर्टाने या कंपनीचा मालकी हक्क कामगारांना देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. पण कंपनीवर कर्जच एवढे प्रचंड होते की कामगार ही कंपनी चालवू शकले नाहीत. 

कंपनीवर ११६ कोटीचे कर्ज होते. कंपनीविरुद्ध १४० लिटिगेशन्स पेंडिंग होते. ही कंपनी कायमस्वरूपी बंद झाली तर ३५०० कामगार रस्त्यावर येणार होते. कल्पनाने हे आव्हान पेलण्याचे ठरवले. दहा एक्स्पर्टची एक कमेटी स्थापण केली. अभ्यास केला. पाच कोटी कर्जाचे व्याज, दंड मिळून पंचवीस कोटी कर्ज, अशा पद्धतीने प्रत्येक कर्जाचा आकडा वाढत गेला होता. सगळा मिळून ११६ कोटी चा अकडा झाला होता. तिने फायनान्स मिनिस्टरची भेट घेतली. त्यांना सविस्तर माहिती दिली, कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न समजावून सांगितला. कर्जावरील व्याज, दंड माफ करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. 

मंत्र्यांनी लक्ष घातले. बॅंकांशी चर्चा केल्या. कंपनी बंद पडली तर काहीच मिळणार नाही. त्यापेक्षा मुद्दलाची रक्कम तरी मिळेल. बॅंका राजी झाल्या. त्यांनी व्याज माफ केले. न्यायालयाने सात वर्षांत कर्जफेड करायला सांगितली होती. कल्पनाने एका वर्षातच सगळे कर्ज फेडून टाकले. बॅंकांनी पण खूष होवून मुद्दलातही पंचवीस टक्के सुट दिली. कामगारांचे थकलेले पगार तीन वर्षांत अदा करायचे होते तिने ते तीन महिन्यांतच देवून टाकले. एवढे करुनही कंपनीकडे साडेचार कोटी शिल्लक नफा रक्कम राहिली. 
एका आजारी कंपनीचे तिने फायद्यात चालणाऱ्या कंपनीमध्ये रुपांतर केले. कल्पना कमानी ट्युबज या कंपनीची मालक झाली. कल्पना आज या  ७०० कोटीच्या कंपनीची मालक आहे. या व्यतिरिक्त कमानी स्टील्स, केएस क्रिएशन्स, कल्पना बिल्डर्स अॅंड डेव्हलपर्स, कल्पना असोशिएट्स या सारख्या उद्योग समूहाची मालकी आज कल्पनाकडे आहे. 

कल्पना हिने शैक्षणिक संस्था काढली. समाज उपयोगी संस्था स्थापन केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार सुरु केले.  या कार्याची दखल घेऊन शासनाने सन २०१३ मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने गौरवले, भारतीय महिला बॅंकेच्या बोर्डावर डायरेक्टर म्हणून नियुक्त केले. 

कोणतीही मॅनेजमेंटची डिग्री पदरी नसताना केवळ सातवी पास मागासवर्गीय महिला स्वतःच्या कर्तबगारीवर एवढी मोठी यशाची गरुड भरारी घेऊ शकते ही कल्पनाच अशक्यप्राय वाटणारी, पण ही कल्पना सत्यात उतरवली आहे पद्मश्री कल्पना सरोज यांनी. 

सत्य हे कल्पनेपेक्षाही आचंबित करणारे असते हे दाखवायला यापेक्षा दुसरे कोणते उदाहरण असू शकते? 

या महत्त्वाकांक्षेला लाखो सलाम 🙏
(लेखन- संजन मोरे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा