एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

PPF म्हणजे काय? योजनेचे फायदे व तोटे

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी किंवा Public Provident Fund (PPF):

  • ही योजना भारत सरकारने १९६८ मध्ये सुरू केली होती. ही एक बचत ठेव योजना आहे.
  • या योजनेद्वारे आपण आपले पैसे बचत म्हणून सरकारकडे जमा करतो आणि योजनेचा कालावधी संपल्यावर सरकार आपले पैसे व्याजासहित परत करते.
  • या योजनेमागचा सरकारचा मुख्य उद्देश लोकांमध्ये बचतीची सवय वाढवणे हा आहे.
  • या योजनेसाठीचे आपले खाते आपण जवळचे पोस्ट ऑफिस, भारतीय स्टेट बँक वा कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये सुरू करू शकतो.

योजनेची वैशिष्ट्ये:-

  • या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य असे की ही एक कर बचत योजना आहे. अर्थात या योजनेद्वारे आपण आपली वार्षिक करपात्र उत्पन्नाची रक्कम कमी करू शकतो. कलम ८० सी अंतर्गत या योजनेतील आपली वार्षिक रक्कम आपल्या वार्षिक करपात्र उत्पन्नातून वगळली जाते.
  • शिवाय या योजनेतून मिळणारा परतावा सुद्धा पूर्णपणे करमुक्त असतो.
  • मिळणारे व्याज व हाती येणारी एकूण रक्कमही पूर्णपणे करमुक्त असते. मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस (TDS) सुद्धा कापला जात नाही.

आवश्यक कागदपत्रे:-

या योजने अंतर्गत खाते सुरू करण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक असतात. व्यक्तीची सामान्यतः सर्व माहिती , ओळख – पत्ता याविषयी , देणारे पुरावे लागतात.

  • सामान्य केवायसी (KYC)
  • पॅन कार्ड
  • पत्त्याचा कोणताही एक पुरावा
  • १ फोटो
  • बँक खात्याचे तपशील

योजनेचे नियम व अटी:-

  • या योजनेचा पूर्ण कालावधी १५ वर्षे असतो. खर्चासाठी हवे म्हणून १५ वर्षाच्या आत या योजनेतील रक्कम आपण काढून घेऊ शकत नाही. हा कालावधी संपूर्णतः लॉक इन कालावधी (lock in period) असतो.
  • मात्र योजनेची ३ वर्षे पूर्ण झाल्यावर आपण त्या जमा रकमेवर कर्ज घेऊ शकतो.
  • या योजनेमध्ये आपण किमान ५०० ते कमाल १.५ लाख रुपये  वार्षिक गुंतवणूक करू शकतो. याचा अर्थ एका वर्षात रु ५०० ते १.५ लाख यापैकी आपल्या सोयीने एक रक्कम ठरवून ती प्रत्येक वर्षी जमा करायची.
  • ही वार्षिक रक्कम आपण वर्षातून एकदा एकाच वेळी किंवा प्रत्येक महिन्याला अशी १२ हप्त्यात भरू शकतो.

योजनेतील व्याजदर

  • या योजनेत साधारण बँक बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर मिळतो.
  • प्रत्येक ३ महिन्यांनी सरकार यातील व्याजदराचा आढावा घेते.
  • सध्या १.१.२०१९ पासून लागू असलेला व्याजदर वार्षिक ८% आहे.

परतावा: एका दृष्टिक्षेप

या योजनेतून मिळणाऱ्या परताव्याचे उदाहरण पाहू.

रु ५०० ते १.५ लाख मधील कोणतीही रक्कम आपण वार्षिक हप्ता म्हणून निवडू शकतो. १५ वर्षांनंतर आपली १५ वर्षांतील जमा रक्कम आणि त्यावर मिळालेले व्याज असे दोन्ही मिळून आपला एकूण परतावा असतो.

वार्षिक रक्कम(रु)

कालावधी (वर्षे)व्याजदर (%)एकूण परतावा(रु)
१०, ०००१५८%२,९३,२४२
२५,०००१५८%७,३३,१०७
५०,०००१५८%१४,६६,२१४
१,००,०००१५८%२९,३२,४२९
१,५०,०००१५८%४३,९८,६४३

पीपीफ योजनेचे फायदे/तोटे:

  • पोस्ट ऑफिसची  पीपीएफ योजना ही कर सवलतीस पात्र आहे, तसेच निश्चित परतावाही देते.
  • ही सरकारची योजना असल्यामुळे या गुंतवणुकीमध्ये कोणताही धोका नाही. त्यामुळे यात पैसे गुंतवणे फायद्याचे आहे.
  • याचा व्याजदर मात्र  पंधरा वर्षांच्या लॉकिंग पिरेडच्या मानाने कमी वाटू शकतो. यामुळे ज्याला जास्त रिटर्न्स हवे आहेत त्यांना पीपीएफ योजना रुचेलंच असं नाही.
  • गुंतवणुकीची कमाल मर्यादा निश्चित केलेली असल्यामुळे त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही.


मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

लक्ष्मीची पाऊले

लहानशी गोष्ट आहे. रात्री साडेनऊचा सुमार, एक पोरगा एका चपलेच्या दुकानात शिरतो. गावाकडचा टिपीकल. हा नक्की मार्केटिंगवाला असणार, तसाच  होता तो, बोलण्यात गावाकडचा लहेजा तरीही काॅन्फीडन्ट. बावीस-तेवीस वर्षांचा असेल. दुकानदाराच लक्ष पहिल्यांदा पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज व्यवस्थित पाॅलीश केलेले..!

*दुकानदार* - काय सेवा करू..?

*मुलगा* - माझ्या आईला चप्पल हवीय. टिकाऊ पाहिजे..!

*दुकानदार )* - त्या आल्या आहेत का..? त्यांच्या पायाचं माप..?

मुलाने आपलं वाॅलेट बाहेर काढलं. त्यात चार घड्या केलेला एक कागद होता. त्या कागदावर पेनानं आऊटलाईन काढलेली दोन पावलं होती. 

*दुकानदार* - अरे, मला मापाचा नंबर चालला असता..!

तसा तो मुलगा एकदम बांध फुटल्यासारखं बोलता झाला 'काय माप सांगू साहेब..?
माझ्या आयनं जिंदगीभर पायात कदी चप्पलच घातली नाय. आई ऊसतोड कामगार होती. काट्याकुट्यात कुटं बी जात्ये. अनवानी ढोरावानी मेहनत केली. मला शिकवलं. मी शिकलो अन् नोकरीला लागलो. आज पहिला पगार झालायं. दिवाळीला गावाकडं चाललोय. आईला काय नेऊ..? हा सवालच पैदा होत नाही. माझे किती वर्षांच स्वप्न होते. पहिल्या पगारातून आईला चपला घेऊन जायच्या.'

दुकानदारान चांगल्या टिकाऊ चपला दाखवल्या. आठशे रूपये किंमत होती. त्या पाहून मुलाने 'चालतंय की..!,' असे सांगितले. त्याची तयारी त्याने केली होती.

दुकानदाराने सहज विचारले, 'किती पगार आहे रे तुला..?

*मुलगा* - सध्याच्याला बारा हजार आहे. राहणे, खाणे धरून सात-आठ हजार खर्च होतात. दोन तीन- हजार आईला धाडतो..!

*दुकानदार* - अरे मग आठशे रूपये जरा जास्त होतात. 

मुलाने दुकानदाराला मध्येच रोखत असुद्या म्हणून सांगितले.दुकानदाराने बाॅक्स पॅक केला. मुलाने त्याला पैसे दिले आणि तो आनंदात बाहेर निघाला. एवढी महागाची भेट किंमत करताच येणार नव्हती त्या चपलांची...!

पण दुकानदाराच्या मनात नेमके काय आले कुणास ठाऊक. मुलाला, जरा थांब असे सांगितले. दुकानदाराने अजून एक बाॅक्स मुलाच्या हातात दिला.

दुकानदार म्हणाला, 'ही चप्पल आईला तुझ्या या भावाकडून गिफ्ट असे सांग. पहिली खराब झाली की दुसरी वापरायची. तुझ्या आईला सांग आता अनवाणी फिरायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही.'

दुकानदाराचे आणि त्या मुलाचे असे दोघांचेही डोळे भरून आले. 'काय नाव तुझ्या आईचं..?,' असे  दुकानदाराने विचारलं तर तो *लक्ष्मी* असे ऊत्तरला.

दुकानदार लगेचच बोलला, 'माझा नमस्कार सांग त्यांना आणि एक वस्तू देशील मला..? पावलांची आऊटलाईन काढलेला तो कागद हवाय मला...!

तो मुलगा कागद दुकानदाराच्या हातात ठेऊन आनंदात निघून गेला. तो घडीदार कागद दुकानदाराने  दुकानाच्या देव्हाऱ्यात ठेवला. दुकानातील देव्हाऱ्यातला तो कागद दुकानदाराच्या लेकीनं बघितला आणि तिनं विचारलं, 'काय आहे हे बाबा..!

दुकानदार दिर्घ श्वास घेऊन आपल्या लेकीला बोलला *लक्ष्मीची पावलं'* आहेत बेटा...!. एका सच्च्या भक्ताने काढली आहेत. त्यानं बरकत येते धंद्याला..!. लेकीनं, दुकानदाराने आणि सगळ्यांनीच मनोभावे त्या पावलांना नमस्कार केला..!
🌹🙏आई साठी🌹🙏 ( कोणी लिहिली माहीत नाही आवडली म्हणून सामाईक केली)