एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

रिऍलिटी लेखक मयूर जोशी

रिऍलिटी - 1

मॅट्रिक्स सिनेमा कोणी कोणी बघितलेला आहे? आधुनिक काळामध्ये अत्यंत अवघड विषयाला हात घातलेला हा अत्यंत गुंतागुंतीचा सिनेमा. या सिनेमामध्ये व्हर्च्युअल जगामध्ये सामान्य लोक जगत असतात. त्यांना माहित नसते की आपण प्रत्यक्षामध्ये एका ठिकाणी झोपून आहोत व आपण जगत आहोत ते स्वप्नामधील जग आहे. काही लोकांना मात्र या झोपलेल्या अवस्थेत मधून जाग येते व सत्य काय आहे ते लक्षात यायला सुरुवात होते. हा माझा प्रचंड आवडता सिनेमा आहे कारण भारतामधील अद्वैत वेदांत किंवा तशा पद्धतीचेच तत्त्वज्ञान यामध्ये दाखविण्यात आलेले आहे एका वेगळ्या प्रकारे.

जास्त खोला मध्ये जात नाही परंतु सरळ आता मुद्द्याला हात घालतो. 

काही माणसांचे चरित्र वाचले असता किंवा त्यांना समजावून घ्यायचा प्रयत्न केला असता असा प्रश्न पडतो की ही माणसे नक्की कोणत्या दुनियेमध्ये जगत होती??

उदाहरणार्थ
1. रामकृष्ण परमहंस: गळ्याचा कॅन्सर झाला होता. गळ्याला भोक पडले होते. खाणेपिणे जवळपास बंदच. या अवस्थेमध्ये देखील हा माणूस तितकाच आनंदी. प्रचंड हसतमुख. कोणी एका भक्ताने त्यांना विचारले, " ठाकूर, खूप जास्त दुखत आहे का?" रामकृष्ण म्हणाले हो खूप दुखतयं. तेवढ्यात बाजूला बसलेले दुसरे भक्त रामकृष्णांनी कडे बघून म्हणाले "तरीदेखील आत्मनंदामध्ये तल्लीन आणि मजा घेतायत.'
त्याच्याकडे बघून रामकृष्ण शरीराला सोसत नव्हते तरी जोरात हसले, म्हणाले "साला,  याला बरोबर समजले" 

2. येशू ख्रिस्त: क्रॉस ला हातापायांना खीळे मारून लटवल्यानंतर, प्रचंड मारहाण झाल्यानंतर हा माणूस प्रार्थना करतो, हे माझ्या परमेश्वरा, बापा, यांना माफ कर यांना समजत नाहीये ते काय करत आहेत.

3. साईबाबा: अत्यंत शरीराची कठीण अवस्था, परंतु येणाऱ्या जाणाऱ्याशी अत्यंत शांत आणि हसतमुख. कोठेही वेदनेची तक्रार नाही.

असे असंख्य जण होऊन गेले. प्रचंड शारीरिक किंवा आर्थिक त्रासांमध्ये असताना या लोकांनी व्यवहारांमधील उपाय वापरले. म्हणजेच रामकृष्ण परमहंस हे डॉक्टरी उपचार घेत होते. परंतु कालीमाते कडे त्यांनी एकदाही प्रार्थना केली नाही की मला बरं वाटू दे. उलट त्यांना काही लोकांनी सुचवले होते की तुमची मनाची शक्ती इतकी जास्त आहे ती थोडा वेळ जरी तुम्ही आपल्या आजाराकडे लक्ष केंद्रित केले तर तो बरा होऊ शकेल. त्यावर रामकृष्णांनी रागावून सांगितले, म्हणजे मी या घाणीने भरलेल्या शरीरासाठी माझ्या आई (कालीमाता) वरील लक्ष एक सेकंदासाठी तरी हलवू काय?? 

या लोकांना व्यवहारांमधील गरिबी, लोकांनी दिलेली अत्यंत घाणेरडी वागणूक, शरीरावर आलेले दुखणी कशाचेच काही पडलेले नव्हते. यामधील बऱ्याच जणांना आपल्या मधील लोक गुरु किंवा संत म्हणतात. त्यांना मानतात आणि त्यांच्या समोर नतमस्तक होतात. परंतु खरोखरच हे लोक असे का होते याला मात्र चमत्कार असे एकच नाव दिले जाते. असेल देखिल. परंतु तो चमत्कार जर का ते लोक करू शकत होते तर मग आपण का नाही हा प्रश्‍न कोणाच्याच मनात येत नाही. 

कोणत्या जगात जगत होते हे लोक? काय या लोकांची रियालिटी वेगळी होती?? वेगळ्या डायमेन्शन मध्येच जगत होते की काय? असे बरेच प्रश्न मनामध्ये यायचे यांना वाचताना. यांना समजून घेताना. कारण हे सर्व मानवी कक्षाच्या बाहेरचे वाटायचे.

मग काही काळाने अद्वैत वेदांत वाचनामध्ये आला. त्यामधून काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या त्या खाली देण्याचा प्रयत्न करतो.

मांडक्योपनिषद, केन उपनिषद, तैतिर्या उपनिषद, अशी अनेक उपनिषदे थोडीफार वाचनामध्ये आली. त्यामध्ये मुख्यतः तीन प्रकारच्या अवस्था किंवा रियालिटी सांगण्यात आलेले आहे.

1. जागृतावस्था व त्यामधील रियालिटी: 

आपण जागे असताना जे काही करत असतो ते सर्व काही या रियालिटी मध्ये येते. या रियालिटी मध्ये शरीर आणि मन आणि बुद्धी हे तिने पूर्णपणे कार्यरत असतात. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत जे काही सत्य आपण जगत असतो ते हे. 

2. स्वप्नावस्था व गाढ निद्रा (deep sleep) : 

दिवसभरामध्ये जे काही सुख आणि दुःख किंवा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये येतात, त्यापैकी खूप सार्‍या गोष्टी आपण झोपल्यानंतर विसरून जातो. बऱ्याच वेळेला शरीराच्या दुखणे देखील विसरून जातो. एखादे व्यसन असेल तर त्याची जाणीव आपण जागे असताना आपल्याला असते. परंतु झोपल्यानंतर मात्र त्या व्यसनाची देखील जाणीव आपल्या मनाला होत नाही. या अवस्थेमध्ये शरीराचा भाग अत्यल्प असतो. शरीर नावासाठी असते. ते निद्रितावस्थेत व अचेतन अवस्थेमध्ये असते. बऱ्याच वेळेला दिवसभर घडलेल्या घडामोडी आणि स्वप्न यांमध्ये काडीचेही साम्य नसते. आपण जवळपास सहा ते आठ तास या जगामध्ये जगत असतो. म्हणजेच जागृत अवस्थेमधील प्रॉब्लेम किंवा आनंद विसरून जाऊन आपण स्वप्नांमध्ये चाललेल्या गोष्टीं जगत असतो. या सहा ते आठ तासांसाठी आपले जग बदललेले असते, आपले सुख बदललेली असतात, माणसे बदललेली असतात, व भीत्या देखील. 

प्रत्येक रात्री काही सेकंदांसाठी किंवा अत्यंत कमी कालावधीसाठी माणूस गाढ निद्रे मध्ये प्रवेश करतो. त्या वेळेला कोणताही विचार मनामध्ये येत नाही. त्यामुळे कोणतेही स्वप्न देखील मनासमोर नसते. पूर्ण ब्लँक. फक्त शरीर चालू असते, मन चालू असते परंतु मनाचा व्यवहार ठप्प झालेला असतो.

3. याला सुशुप्ती किंवा तुर्या अवस्था असे आपण नाव देऊ. म्हणजेच आत्मसाक्षात्कार.

ही अवस्था फार कमी लोकांना लाभलेली असते. व त्यामधील फार कमी लोकांना कायमस्वरूपी लाभलेली असते. या अवस्थेचे वर्णन मी नंतर करण्याचा प्रयत्न करेन. त्याआधी पहिल्या दोन अवस्था आहेत याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

स्वप्नावस्था सर्वसाधारण माणसासाठी फारशी महत्त्वाची नसते. जोपर्यंत त्या अवस्थेत अति आनंद किंवा आती वेदना नसतात. सर्वसाधारण आपण रोज स्वप्न बघतो व उठल्यानंतर विसरून जातो. परंतु एखादे स्वप्न अत्यंत भयानक व अत्यंत घाणेरडी परिस्थितीचे असले, तर दिवसभर त्या स्वप्नाची सावली आपल्या दिनचर्या वर पडलेली असते. बऱ्याच वेळेला अत्यंत भीतीदायक पडलेले स्वप्न आपण उठल्यानंतर विसरुन जाण्याचा प्रयत्न करतो, हे सांगून की ते फक्त स्वप्न होते खरेखुरे काहीही नव्हते. 

थोडक्यात स्वप्नातून उठल्यानंतर जे काही स्वप्नात चांगले किंवा वाईट घडले असेल त्याला आपण कमी दर्जा देतो. आपण स्वतःला समजावते की हे फक्त स्वप्न होते व मनाचे खेळ होते. आता खरा दिवस आणि करे आयुष्य चालू झालेले आहे त्यावर लक्ष देऊया.

ज्याप्रमाणे स्वप्नावस्थे मधून जागृतावस्थेत आल्यानंतर स्वप्नातील भीत्या किंवा दुःख आणि वेदना याचा आपण फारसा विचार करत नाही, त्याच प्रमाणे अजून अशी कोणती अवस्था असू शकते का? जेथे जागृत अवस्थेमधील गोष्टी या खोट्या वाटतील??? ज्याप्रमाणे स्वप्नातील गोष्टी आपल्याला भासमय वाटतात उठल्यानंतर.

मला माहिती आहे, हे थोडेसे गुंतागुंतीचे असू शकते समजण्याकरता. परंतु जास्तीत जास्त सोपे व त्यामुळे लांबलचक लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. 

आता आपण उदाहरण घेऊ स्वप्नातील एखादे भयानक देखाव्याचा. आपल्या समोर जंगल आहे आणि तेथे एक भयंकर नाग आपला पाठलाग करीत आहे. आपण धापा टाकत पाळण्याचा प्रयत्न करत असतो. प्रचंड घाबरलेले असतो. आता आपली सुटका नाही व आपण मरणार ही भीती आपल्याला वाटत असते. आणि तेवढ्यात आपले डोळे उघडतात. डोळे उघडल्याबरोबर दोन सेकंदांनी आपण भानावर येतो. आपण हुश्श शकतो. मनातल्या मनात छान वाटते की ते स्वप्न होते. 

परंतु आपण कधी असा विचार केलेला आहे का? स्वप्नामध्ये जे समोर जंगल होते ते कुठून आले बरं?? स्वप्नामध्ये जो नाग होता तो कुठून आला?? आपल्याच मनाने जंगलही तयार केले होते व आपल्याच मनाने नाग नही तयार केला होता व आपलेच मन मी बनून सैरावैरा धावत देखील होते. म्हणजेच ते जंगल आणि तो नाग हे माझ्यापेक्षा वेगळ्या आहेत अशी समज स्वप्नामध्ये आपल्याला होती. त्यामुळे आपण त्याला घाबरून पाळायचा प्रयत्न करत होतो.

आता एक प्रश्न विचारतो.

ज्याप्रमाणे स्वप्नांमध्ये आपल्यापासूनच सर्व गोष्टी तयार होऊन देखील आपल्याला हे अज्ञान होते की ते जंगल आणि नाग हे माझ्यापेक्षा वेगवेगळे होते. परंतु ते जंगल आणि तो नाग म्हणजे मीच आहे हे ज्ञान स्वप्नांमध्ये नसल्यामुळे आपण त्याला घाबरत होतो. 

तसेच जर का जागृत अवस्थेमध्ये देखील असले तर?????????????

म्हणजेच जागृत अवस्थेमध्ये आपल्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट हि आपणच तयार करत असलो तर?? प्रत्येक चांगली परिस्थिती आणि वाईट परिस्थिती आपणच तयार करत असलो तर??? केवळ आपल्याला स्वप्नांमध्ये हे ज्ञान नव्हते की आपणच ते जंगल आणि त्यातील भीती वाटणाऱ्या गोष्टी आहोत. तसेच जागृत अवस्थेमध्ये देखील आपल्याला ज्या गोष्टींनी आनंद होतो किंवा दुःख होते ते सर्व आपल्यापासूनच तयार झालेले असेल तर???

जसे स्वप्नामधून उठल्यावर जागृतावस्थेत येतो आणि स्वप्नांमधील दुःख, वेदना आणि भीत्या संपून जातात. तसेच एखादी अवस्था जागृत अवस्थेच्या वरती एखादी व्यवस्था असेल जेथे उठल्यानंतर जागृत अवस्थेमधील गोष्टी या अजिबात भीतीदायक दुःखदायक किंवा आनंददायी देखील वाटणार नाहीत?? आपण जागृत अवस्थेमधील कोणत्याही गोष्टीला फारसे महत्त्वच देणार नाही मग. 

तीच अवस्था आहे तुर्यावस्था. जेथे जागृत अवस्थेमधून उठल्या सारखे वाटते. जे काही आपण जागृत अवस्थेमध्ये चांगले आणि वाईट उपभोगत होतो हे सर्व मायाजाळ आहे हे लक्षात येते. हे सर्वकाही आपल्याच इच्छेने घडून आले आहे याची जाणीव होते. आपल्याला त्रास देणारे आणि आनंद देणारे सर्वच घटक, माणसं हे आपल्यापासूनच तयार केलेले आहेत हे लक्षात येते. ज्याप्रमाणे स्वप्नामधील प्रत्येक घटक हा आपल्या मनाने तयार केलेला होता. 

याकडे फक्त एक तत्त्वज्ञान म्हणून बघा किंवा एक विचार म्हणून बघा किंवा एक सत्य परिस्थिती म्हणून बघा. परंतु पाच ते सहा हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या या गोष्टी किती प्रचंड चिंतन करून आणि विचार करून लिहिले असतील याचे मला कौतुक वाटते. 

पाश्‍चात्त्य जगतामध्ये आणि सायन्समध्ये मनाचा किंवा अंतर्मनाचा अभ्यास हा गेल्या शंभर ते दीडशे वर्षांमध्ये खरा चालू झाला. ग्रीक किंवा इजिप्तमधील संस्कृती हे आपल्यासारखेच जुने परंतु तेथे अशा प्रकारचा वैचारिक उहापोह कोठेही झालेला दिसत नाही. अरिस्टोटल आणि प्लेटो, यांच्यासारखे विचारवंत नक्कीच आढळतात परंतु ते उपनिषदांत सारखे अत्यंत खोलवर गेलेले दिसत नाहीत. 

 परंतु याबाबत इतक्या सखोलपणे आपल्या उपनिषदांमध्ये लिहिलेले आहे हे बघून आश्चर्य आणि आनंद याला पारावार राहत नाही. त्याचबरोबर इतके प्रचंड वैचारिक खाद्य आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी तयार करून ठेवले आहे त्याचा लाभ आपण भारतीयच घेत नाही याचा खेदही वाटतो.

स्वप्ना अवस्थे मधून जागृत अवस्थेमध्ये उठायला आपल्याला तितकेसे प्रयत्न करावे लागत नाहीत. त्यामुळे त्या दोन अवस्था आपण कधीही नाकारत नाही. परंतु तुर्यावस्था या अवस्थेत जाण्याकरता सखोल चिंतन फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी मार्ग देखील सांगण्यात आलेले आहेत. 

अद्वैत वेदांत यामध्ये तीन टप्प्यांमध्ये तुर्या अवस्थेमध्ये जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे. 

श्रवण
मनन
निदिध्यास

याच्या पुढच्या भागांमध्ये मी या तीन टप्प्यांचा खुलासा करत जाईन. 
मी लांबलचक लिहीत आहे परंतु त्याचे कारण इतकेच आहे की सर्वजण असामान्य बुद्धीचे नसतात. माझ्यासारखे अल्पमती लोक देखील असतात त्यांना अत्यंत सोप्या गोष्टी करून सांगितले की लवकर लक्षात येऊ शकते. यासाठी हा खटाटोप.

क्रमशः

#mayurthelonewolf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा