एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

मी म्हणजे कोण?

रिऍलिटी 3-

आज आपण या लेखाचा तिसरा भाग बघणार आहोत. 
मजा म्हणून येथे एक छोटीशी गोष्ट सांगतो एका प्रचंड महान अद्वैतवादी संताची.
रमण महर्षि.
एकदा एक व्यक्ती रमण महर्षि यांच्याकडे आली. ती व्यक्ती रमाना महर्षींना म्हणाली, "मी अद्वैतवादी नाही. तुम्ही प्रत्येकाला एकच सांगता की मी कोण आहे हे शोधून काढ. परंतु मी तर विष्णूचा भक्त आहे. तर मी तुमच्या पद्धतीप्रमाणे मी कोण आहे याचा विचार न करता फक्त विष्णूची भक्ती केली तर चालेल का?"
रमण महर्षि म्हणाले "हो".
" मग मेल्यानंतर मी वैकुंठात जाईन का?"
रमण महर्षी म्हणाले, "हो का नाही जाणार?"
"मग माझ्याशी प्रत्यक्ष विष्णू बोलू शकतील का?"
"हो, विष्णू तुझ्याशी बोलतील."
" अरे वा, ते माझ्याशी काय बोलतील?"
रमण महर्षी म्हणाले," विष्णू हेच सांगतील मी म्हणजे कोण हे शोधून काढ."
🙂🙂😂😂😂😁

थोडक्यात मी म्हणजे कोण हे शोधून काढणे हे कोणत्याही मार्गाचे शेवटचे ध्येय आहे. असे रमण महर्षींना सांगायचे असावे. मग तो भक्तिमार्ग असो किंवा राज योगाचा मार्ग असो. 

आता आपण मुख्य विषयाकडे वळू.
तिसऱ्या भागाकडे डायरेक्ट जाण्याआधी मी फक्त थोडीशी उजळणी करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे लिंक लवकर लागू शकेल
अद्वैत वेदांत नुसार तीन प्रकारच्या रियालिटी असतात. 
1. स्वप्नावस्था
2. जागृत अवस्था
3. तुर्या अवस्था
यापैकी आपण नेहमी स्वप्न किंवा निद्रावस्था आणि जागृतावस्था यामध्ये जगत असतोच.  निद्रा अवस्थेमधील किंवा स्वप्नामधील भीती किंवा दुःख हे आपण जागे झालो की क्षणामध्ये नष्ट होऊन जातात. जागृत अवस्थेमधील आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही दुःख किंवा भीती अनुभवत असतो ती आपल्याला कशी बरे नाहीशी करता येईल? त्याकरता तिसऱ्या रियालिटी चा विचार केलेला आहे. 
हे एका प्रकारचे तिसरे डायमेन्शन म्हटले तरी चालेल. तर या डायमेन्शन मध्ये करण्याकरता तीन स्टेप्स सांगितलेल्या आहेत.
1. श्रवण
2. मनन
3. निधीध्यास

यापैकी श्रवण म्हणजे ज्ञानी अशा गुरूंकडून सत्य वचन ऐकत राहणे. अद्वैत वेदान्ताचा बेस हा मुळात या एका वाक्यावर आहे ते वाक्य म्हणजे "अहम ब्रह्मस्मी" किंवा ब्रम्हे एकच सत्य आहे बाकी सर्व मिथ्या. ब्रम्ह हे एकमेव सत्य. 

तर मागच्या भागांमध्ये आपण श्रवण म्हणजे काय हे बघितले. त्यामध्ये गुरूच्या या शिकवणीला शिष्य किती प्रकारे प्रश्न विचारू शकतो त्याला मर्यादा नाही. किती प्रश्न विचारले त्याला उत्तर द्यावेच लागतात. जितक्या शंका तितकी उत्तरे.

मागील भाग वाचून बघितला असता आता या प्रकारच्या गुरूने दिलेल्या उत्तरामुळे मेंदूचे समाधान होते. किंवा बुद्धीचे समाधान होते असे वाटू शकेल. परंतु त्यामुळे मी म्हणजेच ब्रम्ह आहे हीच स्थिती अनुभवता कसे बरे येईल?

खरेतर अद्वैत वेदांत हा सगळ्यात सोपा आणि सहज मार्ग. ज्यामध्ये प्रत्यक्ष ध्यानधारणा किंवा जप-तप याची खरी गरज लागत नाही. कारण प्रत्येक दुःखाचे मूळ हे अज्ञान असते. जर का ते अज्ञान दूर करुन ज्ञान मिळवले की आपोआप दुःखाचे निराकरण झालेले असते. 

समजा मला माझ्या आयुष्यात प्रचंड दुःख झाले आहे. माझे आवडते व्यक्ती मला सोडून गेली, किंवा माझा उद्योग धंदा बुडुन गेला आणि गरिबी आली किंवा अशा अनेक प्रकारे मी दुःखी झालेलो आहे. तर यावरील उत्तर हे असेल का? की मला सोडून गेलेली व्यक्ती मला परत मिळाली. किंवा माझा बुडलेला धंदा व्यवस्थित चालू लागला. त्यामुळे त्यात पुरते दुःखाचे निवारण होईल. परंतु कायमस्वरूपी दुःखाचे निवारण शक्य आहे का? तर नाही. 
परंतु जर का हे लक्षात आले की ज्या प्रमाणे स्वप्नांमध्ये आपण जे धन मिळवतो किंवा एखादी प्रिय वस्तु मिळवतो. आणि स्वप्नातून जागे झाल्याबरोबर ते सर्वजण आणि ती वस्तू आपल्यापासून नाहीशी झालेली असते. म्हणजेच आपल्याला ज्ञान झालेले असते की जे काही आपण बघत होतो ते सत्य नव्हते. तसेच ज्ञान जर का आपल्याला या जागृत जगामध्ये झाले तर समोरील परिस्थिती बदलणार नाही परंतु त्यामुळे दुःख मात्र होणार नाही. 

अद्वैत वेदांत हे सांगत नाही की तुमच्या वर वाईट प्रसंग येणार नाही किंवा संकट येणार नाहीत. ते जशी यायची आहेत तशीच येतील. प्रचंड वाईट गोष्टी घडतील देखील. परंतु त्याचा तुमच्या समाधान वर आणि आनंदावर कोणताही फरक पडणार नाही याची शाश्वती अद्वैत वेदांत देतो. ज्याप्रमाणे आपण जागे असताना आपण स्वप्न काय पडणार आहे त्याला फारसे घाबरत नाही. आणि वाईट स्वप्न जरी पडले तरीदेखील आपण त्याची फारशी चिंता करत नाही तसेच. 

म्हणजेच थोडक्यात आपल्याला दुःख होते ते अज्ञानामुळे. जर का हे समजले की मी म्हणजे ब्रह्म आहे म्हणजेच ज्ञान मिळाले की त्यानंतर दुःखाचे कारण राहणारच नाही.

पण गुरूच्या तोंडून फक्त हे ज्ञान ऐकल्यामुळे मी ब्रह्म आहे याची जाणीव प्रत्येकाला होईलच असे नाही. काही जीव जन्मतःच अत्यंत समजदार व कमी गुंतागुंतीचे असतील त्यांना ही गोष्ट गुरूने सांगितल्या सांगितल्या काही वेळात लक्षात येईल व त्याची जाणीवही होईल. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना याची जाणीव लगेच होत नाही म्हणून त्यासाठी पुढील भाग येतो तो म्हणजे मनन आणि निधीध्यास

मनन:
तर मनन म्हणजे काय?
गुरूकडून ज्ञान ऐकल्यानंतर त्यावर विचार करणे. जे आपल्या बुद्धीला पटले आहे त्याला आत पर्यंत घेऊन जाणे. परंतु बुद्धीला पटलेल्या गोष्टी अनुभवायला येत नसल्यामुळे मनाला पटतील असे नाही. त्याचे कारण काय?
आता आपण याचा शोध स्टेप-बाय-स्टेप घ्यायला सुरुवात करू.
कोणतीही गोष्ट आपल्याला अनुभवास येऊ शकते ते फक्त त्या वेळेला जेव्हा आपली एकाग्रता अत्युच्च पातळीची असेल. गुरु जे काही सांगत आहेत त्या गोष्टीवर 100% एकाग्रचित्त असेल तर त्याची जाणीवही ही त्या क्षणी होईल. परंतु आपले चित्त हे बऱ्याच गोष्टींमध्ये विखुरलेले असते. त्यामुळे गुरु यांनी सांगितलेले ज्ञान " मी म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म आहे" हे बुद्धीला थोडेफार पटले तरी देखील मनावरील असलेल्या अनेक कश्यामुळे ते सरळसोट आत पर्यंत जात नाही.
यालाच दोष असे म्हणतात. याला विक्षेप असे नाव या संस्कृतमध्ये दिलेले आहे. 

तर विक्षेप म्हणजे काय?
गुरूने आपल्याला ज्ञान दिले तरीदेखील ते मनाच्या वर पर्यंतच राहणे व आत पर्यंत न जाणे. त्याची जाणीव न होणे. त्याचे कारण आपले चित्त व मन हे कायम विखुरलेले असते. त्यामुळे गुरूने कितीही वेळा सांगितले तरी देखील ते ज्ञान आज पर्यंत पोहोचत नाही. 
मग त्यावर शिष्य तक्रार करतो कि मी तुम्ही सांगितलेले ऐकले आहे परंतु ते आज पर्यंत जाणिवेला का येत नाही बरे? 
त्याचे कारण आहे विक्षेप.

चित्त एकाग्र नसणे म्हणजेच विक्षेप या दोषाला कसे घालवावे बरे? कारण जर का चित्त एकाग्र नसेल तर गुरूकडून तीच गोष्ट हजार वेळा ऐकून किंवा त्याचा विचार करून फायदा होत नाही. मग त्यासाठी आपल्याला चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजेच जप किंवा ध्यानधारणा किंवा त्राटक किंवा अन्य काही उपाय. 

म्हणजेच अद्वैत वेदांत यामध्ये खरातर या गोष्टींचा उपयोग वरवर दिसून येत नाही परंतु चित्त एकाग्र करण्याकरता मात्र यांचा साधन म्हणून उपयोग करावा लागतो आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना. ध्यानधारणा व व विविध एकाग्रतेची साधने यांचा वापर करून सर्वप्रथम मनावर असलेली आवरणे हळूहळू दूर होऊ लागतात. यासाठी कोणाला किती कालावधी लागेल याचा नेम नाही. जितकी जास्त तीव्रता तितके लवकर यश. 

जसे मनावरील आवरण हळूहळू दूर व्हायला लागेल तसे जास्त स्पष्ट सत्य दिसू लागते जे गुरुने सांगीतलेले आहे. आता आपण हे छोट्या उदाहरणांमधून लक्षात घेऊ म्हणजे जास्त लक्षात येईल.

समजा एखाद्याच्या गुरूंनी बुद्धीच्या सर्व शंका दूर करून एका शिष्याला पटवून दिले की तू म्हणजे ब्रह्म आहेस. शिष्य घरी जाऊन हेच वारंवार बोलू लागला परंतु त्याला काही अनुभवायला येत नव्हते किंवा त्याला ही जाणीव होत नव्हती की मी म्हणजे ब्रम्ह आहे. 
मग तो शिष्य तक्रार करतो कि तुम्ही मला सर्व सांगितलेत तरीदेखील मला काही समजत नाहीये की मी म्हणजे ब्रह्म आहे. याचे काय कारण?
मग त्याचे कारण असते ते म्हणजे विक्षेप. म्हणजेच वर्षानु वर्ष इकडे-तिकडे भरकटलेले मन. मग त्यावर उपाय असतो जप किंवा ध्यानधारणा वगैरे. राजयोग किंवा हटयोग या ठिकाणी वापरला जातो. अद्वैत वेदांत यामध्ये राजयोग आणि हटयोग एक साधन म्हणून जेणेकरून त्याचा उपयोग मनाची एकाग्रता साधण्याकरता होईल. 
आता शिष्य प्राणायाम करू लागतो किंवा ध्यानधारणा करू लागतो परंतु अजून एक प्रॉब्लेम त्याच्या समोर येतो. तो म्हणजे आहे ध्यान करताना देखील मन इकडे-तिकडे धावत राहते. त्याला झोप यायला लागते नाहीतर पन्नास विचार मनामध्ये यायला लागतात. मग तो पुन्हा गुरूंकडे जाऊन म्हणतो हे काय मला ध्यान व इतर साधने देखील जमत नाहीयेत जी एकाग्रता करण्यासाठी लागतात.
मग मग अजून एक प्रॉब्लेम सांगितलेला आहे त्याचे नाव चित्तं मल.. म्हणजेच मनावर साठलेली अनेक पुट. या जन्मातील अनेक वर्षांमधील केलेली बरेच कामे व विचार ज्यामुळे मन व चित्त हे दूषित झालेले असते. जोपर्यंत ते गढूळ आहे तोपर्यंत पलीकडील दिसेल कसे?
त्यामुळे या दोषावरती अद्वैत वेदांता मधील उपाय आहे निष्काम कर्मयोग. म्हणजेच जास्तीत जास्त लोकांना निरपेक्षपणे मदत करीत राहणे हा उपाय. अशाप्रकारे लोकांसाठी काम केल्यामुळे आपोआप चित्त आणि मनावरील दोष आणि गढूळता नाहीशी होते व त्यामुळे त्या शुद्ध होण्यास मदत होते.

आता आपण वरती बरेच काही बोललो त्यामुळे गोंधळ होण्याचा संभव जास्त. त्यामुळे एक उजळणी करू या. 
आपला खरा प्रॉब्लेम काय आहे आणि त्याचा उपाय काय हे आपण खाली एकदम थोडक्यात बघू.

1.अज्ञाना वरील उपाय असतो ज्ञान.
2. मी कोण आहे व मला दुःख का आहे अज्ञान आहे त्यावरील उपाय एकच असू शकतो तो म्हणजे मी कोण आहे हे ओळखणे.
3. मी कोण आहे हे जरी गुरूंनी सांगितले तरी देखील ते मनाच्या आत पर्यंत किंवा चित्ता पर्यंत पोहोचत नाही. म्हणजे येथे दोष आहे त्याला म्हणतात विक्षेप. आणि विक्षेप याचा उपाय म्हणजे मनाची एकाग्रता. म्हणजे राजयोग किंवा हटयोग यांचा सहारा घेऊन आपले मन एकाग्र करणे जेणेकरून ज्ञानाची प्राप्ती होईल. 
4. ध्यानधारणा किंवा राज्य योगामधील उपाय वापरून देखील मन एकाग्र करताना अडचण येत आहे. याचे कारण मलीन चित्त. व त्याचा उपाय आहे कर्मयोग. त्यामुळेच गीता या उपनिषदांमध्ये कर्मयोगाचे महत्व सर्वात जास्त आहे. कारण मुळात मनच मलिन असल्यामुळे पुढील कोणत्याच गोष्टी आपल्याला करणे शक्य होत नाही व आपण ज्ञानापासून दूर राहतो. त्यामुळे निष्काम कर्म योगामुळे मनावरील गढूळता नष्ट होऊ लागते मन निर्मळ होऊ लागते.

यामध्ये उपाय कोणता आणि त्याचे खाद्य कोणते किंवा साधना कोणती आणि त्याचे साधन कोणते हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे.
कर्मयोग हे मी म्हणजे कोण हे माहिती करून घ्यायचे साधन नाही किंवा मन एकाग्र करण्याचे देखील साधन नाही. कर्मयोगाचे साध्य हे मनाची गढूळता आणि मलिनता दूर करणे.
ध्यान किंवा प्राणायाम किंवा जप या साधनेचे उद्दिष्ट मी म्हणजे कोण याचे ज्ञान होणे नाहीये. तर यांचे उद्दिष्ट आपले मन एकाग्र होणे हे आहे. कारण एकाग्र मन असेल तरच ज्ञानप्राप्ती होऊ शकते. 

अर्थात हे एक मेकाला ट्रेनच्या डब्यात सारखे जोडलेले असतात तरीदेखील यामधील साध्य काय आणि त्यासाठी लागणारे साधन काय हे लक्षात येणे फार गरजेचे आहे. 

या प्रकारे चालत असताना मनन आणि निदिध्यास हे एकत्रपणे चालू राहतात.
वरील सर्व उपाय केल्यानंतर ज्यावेळेला शिष्य मनन करीत असतो त्या वेळेलाच काही क्षणांसाठी त्याला अचानक मी म्हणजे कोण याची जाणीव होते. परंतु ती जाणे हो 24 तास राहत नाही. त्यामुळे सतत ती जाणीव ठेवण्याचा प्रयत्न किंवा ती अवस्था टेकवण्याचा प्रयत्न म्हणजे निदिध्यास. 

म्हणजेच मी कोण हे काही काळासाठी लक्षात आल्यामुळे दुःखांचे किंवा प्रॉब्लेम्स चे कायमस्वरूपी निराकरण होणे शक्य नाही कारण काही वेळाने आपण मी म्हणजे कोण हे विसरून जातो. किंवा इतर देहाच्या व मनाच्या कारभारामध्ये अडकल्यावर त्याचा विसर पडतो. त्याचा विसर कसा पडला नाही पाहिजे या अभ्यासाला नीदिध्यास असे म्हणतात. म्हणजेच एका प्रकारे अनुसंधान. 

शिष्याला काही क्षणांसाठी किंवा काही वेळासाठी मी म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म आहे हे ज्ञान झाल्यावर त्याला आपसूकच लक्षात येते हे मला कशाचीही भीती नाही. सर्वकाही तयार झाले आहे ते माझ्यापासून. व सर्व काही विलीन होते ते देखील माझ्यात. त्यानंतर आपसूकच त्याला ही अवस्था 24 तास टिकावी असे वाटायला लागते. त्यामुळे त्याचा त्या दिशेने प्रयत्न चालू राहतो.

अद्वैत वेदांत म्हणजेच मी प्रत्यक्ष ब्रम्ह आहे या जाणिवेने पर्यंत पोहोचण्याचा ज्ञानमार्ग आणि अत्यंत सरळ मार्ग. हा मी तिसऱ्या भागात थोडक्यात सांगून संपवत आहे. अर्थात याचे तत्त्वज्ञान प्रचंड मोठे आहे व त्यातील विविध गोष्टींसाठी मी अजून भरपूर काही लिहिणार आहे. 
परंतु रियालिटी या मालिकेचा हा शेवटचा लेख आहे. 
यानंतर अनेक प्रश्न मनात तयार झाले असणार. जसे की, मी म्हणजे ब्रम्हा ही अवस्था प्राप्त झाल्यावर काय होते? दुःख आणि वेदना संपून जातात म्हणजे काय? याचा व्यवहारावर किंवा नोरमल लाइफ जगत असताना त्रास होतो का?? असे अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये अनुत्तरीत आहेत.

त्यासाठी मी यापुढे वेगवेगळे स्वतंत्र लेख लिहिणारच.
त्यात पुरते रजा घेतो.

#mayurthelonewolf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा