एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

दस्त नोंदणी बाबत महत्वाचे

नोंदणी व मुद्रांक विभागाचे कामकाज भाग १

नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांच्या जीवनातील अतिशय महत्वाच्या घडामोडींशी निगडीत आहे. स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री, मुद्रांक शुल्क भरणा, विवाह नोंदणी अशा विविध प्रकारच्या कामकाजाकरिता नोंदणी व मुद्रांक विभाग काम करतो.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत :

१. दस्तांची नोंदणी करणे

२. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम व भारतीय मुद्रांक अधिनियम १८९९ ची अंमलबजावणी करणे.

३. विशेष विवाह अधिनियम १८९९ ची अंमलबजावणी करणे.

१. नोंदणीविषक :

१. दस्तांची नोंदणी करणे

२. नोंदणी केलेल्या दस्तांच्या प्रतीलीपी (Copy) तयार करुन जतन करणे व मागणीनुसार प्रमाणित नक्कल देणे.

३. नोंदणी केलेल्या दसताच्या सूची (Index) तयार करणे व मागणीनुसार प्रमाणित नक्कल देणे.

४. नोंदणी केलेल्या दस्ताच्या प्रती व सूची मागणीनुसार पाहणीसाठी व व्यवहारांचा शोध घेण्यासाठी (Inspection & Search ) उपलब्ध करुन देणे.

५. नोंदणी केलेल्या स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाच्या दस्तांची माहिती, मिळकत अभिलेखात फेरफार घेण्यासाठी संबंधित यंत्रणकडे पाठविणे.

६. नोंदणी अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी नियम तयार करणे.

७. नोंदणी अधिनियमाच्या आवश्यकतेनुसार सुधारणा सुचविणे.

२. मुद्रांक विषयक :

१. मुद्रांक अधिनियमाच्या अंमलबजावणी करणे.

२. दस्तास किती मुद्रांक शुल्क वसुली करणे.

३. प्रयोजनासाठी आवश्यक असल्यास मिळकतीचे बाजार मूल्य निश्चित करणे.

४. मुद्रांक शुल्कचा परतावा देणे.

५. मुद्रांक अधिनियमाच्या आवश्यकतेनुसार सुधारणा सुचविणे.

३. विवाह विषयक :

१. विशेष विवाह कायदा, 1954 या कायद्यानुसार विशेष विवाह संपन्न करुन त्याचे प्रमाणपत्र दिले जाते.
२. अगोदरच झालेल्या विवाहाची, विशेष विवाह कायद्यानुसार नोंदणी करणे.

४. बंधपत्र (bond)

१. ज्या दस्तऐवजान्वये एक व्यक्ती, एखादी कृती यथास्थित (दस्तऐवजात कबूल केल्याप्रमाणे) केल्यास/झाल्यास किंवा न केल्यास/ न झाल्यास, दुस-या व्यक्तीला पैसे देण्याचे बंधन स्वतःवर घालून घेते असा दस्तऐवज;

२. ज्या दस्तऐवजान्वये साक्षीदारासमक्ष एक व्यक्ती दुस-या व्यक्तीला पैसे, धान्य अगर कृषी उत्पन्न देण्याचे बंधन स्वतःवर घालून घेते असा दस्तऐवज.

५. अभिहस्तांतरणपत्र (Conveyance) म्हणजे काय?

अभिहस्तांतरणपत्र (Conveyance) म्हणजे सर्वसाधारणपणे,ज्या दस्तऐवजाद्वारे स्थावर अगर जंगम मालमत्ता किंवा कोणतीही संपदा (Estate)/ मालमत्ता (Property) किंवा कोणत्याही मालमत्तेतील हितसंबंध (interest) दोन हयात (between two legal entities) व्यक्तींच्या दरम्यान हस्तांतरीत करण्यात येतात किंवा निहीत (vest) करण्यात येतात आणि ज्याबाबत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे अनुसूची-१ (Schedule-I) मध्ये कोणतीही वेगळी तरतूद नसेल, असा दस्तऐवज.

या प्रकारात पुढील प्रकारच्या दस्तांचा समावेश होतो-

१. विक्री नंतरचे अभिहस्तांतरण (Conveyance on Sale);

२. प्रत्येक संलेख (Every instrument);

३. कोणत्याही दिवाणी न्यायालयाचा प्रत्येक हुकूमनामा किंवा अंतिम आदेश (Every Decree or Order of Civil Court);

४. कंपनी कायदा, १९५६ चे कलम ३९४ अन्वये उच्च न्यायालयाने कंपन्यांचे एकत्रिकरण (Amalgamation) व पुनर्रचना (Reconstruction) बाबत दिलेला आदेश किंवा रिझर्व्ह बँकेने, रिझर्व्ह बँक कायदा, १९३४ चे कलम ४४क अन्वये बँकांचे एकत्रिकरण (Amalgamation) व पुनर्रचना (Reconstruction) बाबत दिलेला आदेश;

६. बक्षिसपत्र/ दानपत्र (Gift Deed) म्हणजे काय?

बक्षिसपत्र/ दानपत्र (Gift Deed) म्हणजे सर्वसाधारणपणे,

१. ज्या दस्तऐवजाद्वारे कोणतीही व्यक्ती आपली स्थावर अथवा जंगम मालमत्ता दस्तामध्ये नमूद केलेल्या व्यक्तीला दान अथवा बक्षिस देते असा दस्तऐवज, किंवा-

२. पूर्वी तोंडी केलेले दान/ बक्षिस जेव्हा लिखित स्वरुपात व्यक्त केले जाते अशा स्वरुपाच्या लिखाणाचा दस्तऐवज

७. वाटणीपत्र (Partition Deed) म्हणजे काय?

वाटणीपत्र (Partition Deed) म्हणजे सर्वसाधारणपणे,
ज्या दस्तऐवजाद्वारे मालमत्तेचे सहमालक त्या मालमत्तेचे पृथक विभाजन (by metes and bounds) करतात अथवा मालमत्तेच्या विभाजनाचा करार करतात असा दस्तऐवज.

यामध्ये पुढील प्रकारच्या दस्तऐवजांचा समावेश होतो.

१. महसूल प्राधिकारी किंवा दिवाणी न्यायालयाने विभाजन घडवून आणण्याविषयी दिलेला अंतिम आदेश;

२. विभाजन करण्याचा निर्देश देण्यात आलेला लवाद निवाडा; आणि

३. मालमत्तेच्या विभाजनासंदर्भात सहमालकांनी कोणत्याही स्वरुपात लिहीलेला व त्यावर स्वाक्ष-या केलेला दस्तऐवज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा