एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, ३० मार्च, २०१७

दस्त नोंदणी प्रक्रिया

दस्त नोंदणी प्रक्रिया

नोंदणी अधिनियम, १९०८ चे कलम २३ नुसार मृत्यूपत्र वगळून इतर दस्त निष्पादित सही झाल्याच्या तारखेपासून ४ महिन्यांच्या आत नोंदणीस सादर करता येतात.

अ.नोंदणी कार्यालयात गेल्यावर दस्त नोंदणी प्रक्रियेतील प्रमुख टप्पे कोणकोणते आहेत?

दस्त नोंदणी करण्यावर कोणत्याही कायदेशीर तरतुदींचे बंधन नसेल तर तो दस्त नोंदणीस स्विकारला जातो. अशा दस्ताच्या नोंदणी प्रक्रियेतील सर्वसाधारपण टप्पे खालीलप्रमाणे आहेत.

१. टोकन रजिस्टरमध्ये नोंद घेतली जाते व टोकन दिले जाते.

२. दुय्यम निबंधकाद्वारे दस्ताची पडताळणी केली जाते.

३. अगोदर पब्लिक डाटा एंट्री केली असल्यास, ११ अंकी सांकेतांकाचे आधारे दुय्यम निबंधक कार्यालयातील संगणकावर डाटा उपलब्ध करुन घेतला जातो अन्यथा दुय्यम निबंधक कार्यालयात इनपुट फॉर्मच्या आधारे डाटा एंट्री केली जाते.

४. यथोचित मुद्रां॑कित केलेला ( देय मुद्रांक शुल्क भरलेला) व नोंदणीस पात्र दस्त नोंदणीस सादर करुन घेतला जातो.

५. आवश्यक ती नोंदणी फी व दस्त हाताळणी शुल्क प्रदान केल्यांनतर त्याची पावती दिली जाते.

६. दस्त निष्पादक पक्षकारांकडून अथवा त्यांचे मुखत्यारपत्रधारकाकडून त्यांचे निष्पादनाचा कबुलीजबाब दिला जातो.

७. दस्तात नमूद मोबदला दुय्यम निबंधक यांच्यासमोर देण्यात येत असल्यास, त्याबाबतची नोंद दस्तावर घेतली जाते.

८. कबुलीजबाब देणा-या पक्षकारास ओळखत असलेल्या ओळखदारांकडून ओळख पडताळणी केली जाते.

९. दुय्यम निबंधक दस्तावर नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र देतात.

ब. दस्त नोंदणीची प्रक्रिया किती वेळात पूर्ण होते ?

सर्वसाधारणपणे दस्त नोंदणीस स्वीकृत केल्यापासून ३० मिनिटांच्या आत दस्त नोंदणी पूर्ण करुन व स्कॅनिंग करुन मूळ दस्त पक्षकारांना परत दिला जातो. तथापि दस्तातील पानांची संख्या ५० पेक्षा जास्त असल्यास, वाढीव प्रत्येक ५० पानांच्या पेजींगसाठी साधारण १० मिनिटे इतका अतिरिक्त वेळ लागतो.

क. दस्त नोंदणीसाठी सादर करण्यासाठी कालमर्यादा :

1. नोंदणी अधिनियम, १९०८ चे कलम २३ नुसार मृत्यूपत्र वगळून इतर दस्त निष्पादित सही झाल्याच्या तारखेपासून ४ महिन्यांच्या आत नोंदणीस सादर करता येतात.

2. एका दस्तावर अनेक पक्षकारांनी वेगवेगळ्या वेळी सह्या केल्या असतील तर पहिल्यांदा झालेल्या सहीपासून सदर कालमर्यादा लावू होते.

ड. दस्ताची नोंदणी का करावी ? त्याचे फायदे काय आहेत?

दस्त नोंदणी केल्यास खालील फायदे होतात-

१. नोंदणी अधिनियम,१९०८ चे कलम ४९ नुसार, संबंधित दस्त त्यामध्ये नमूद व्यवहाराचा कायदेशीर पुरावा (Legal evidence) म्हणून स्विकारला जातो.

२. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम,१८८२ नुसार, विक्रीखत (Sale Deed), गहाणखत (Mortgage Deed ), भाडेपटटा (Lease Deed) व बक्षीसपत्र (Gift Deed) हे दस्त नोंदणी केले तरच त्यानुसार मिळकतीचे हस्तांतरण होते.

३. नोंदणी केल्यास त्या दस्ताचे आधारे हस्तांतरित होणारे हक्क प्रस्थापित होतात.

४. नोंदणी केल्यास त्या दस्तातील पक्षकार, दस्तामध्ये नमूद अटी व शर्ती/ व्यवहारास बांधील राहतात.

५. नोंदणी केल्यास त्या दस्तामध्ये नमूद व्यवहाराची पूर्तता करणेकरिता सक्षम न्यायालयात दाद मागता येते.

1 टिप्पणी: