एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

याला म्हणतात निष्ठा

शिवाजी महाराज गोवळकोंड्याला निघाले.
पालखीत बसले.
मागं-पुढं सैन्यं आहे.

अचानक...

महाराजांची पालखी थांबली.
महाराजांना काही कळेना,
पालखीचा पडदा सरकला.
बाहेरं बघितलं.
रखरखतं, रणरणतं वाळवंट.
म्हणजे,
गोवळकोंडा तर अजून कोसो दूर.

मग पालखी का थांबावी?

महाराजांनी शिलेदाराला विचारलं,
'पालखी थांबवायचं प्रयोजन'.

तसा शिलेदार धावत आला.
'महाराज, गोवळकोंड्याचे बादशहा-कुतुबशहा स्वतः जातीनं आलेत.'

महाराजांना आश्चर्य वाटलं.
गोवळकोंडा तर अजून कोसो दूर.

मग, बादशहा इथं !

महाराज पालखीतनं खाली उतरले.
समोर पाहिलं.

गोवळकोंड्याचे बादशहा-कुतुबशहा.
महाराज नजदीक गेले.
गळाभेट घेतली.

महाराजांनी विचारलं, 'बादशहाजी, आपणं इथं?'

तसा गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला, 'महाराज, महाराष्ट्राचा 'जाणता राजा' आमच्या मातीत येतोय.
त्याची पाऊलं आमच्या मातीला लागण्या अगोदर त्याच्या पाऊलांची पायधूळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथपावेतो आलो महाराज.'

अरे, कोण गौरव माझ्या राजाचा.
एवढचं नाही या गोवळकोंड्याच्या बादशहानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजतगाजत त्यांना स्वतःच्या राजधानीत घेऊन आला.

आगत-स्वागत, सत्कार-सोहळा झाला आणि गोवळकोंड्याचा बादशहा महाराजांना आपलं ऐश्वर्य, सामर्थ्य, संपत्ती दाखवत निघाला.

'महाराज, हा आमचा खजाना.
हिरे, मोती, माणकं, सोनं, नाणं.
राशी राशी नुसत्या'.

बघत राहिले महाराज.

अरे, कोण ऐश्वर्य!!! कोण संपत्ती!!!

'महाराज, हि आमची अस्त्रंशाळा.
इथं नानाविध अस्त्रं तयार केली जातात.'
महाराज चकित झाले.

'महाराज, हि आमची शस्त्रंशाळा.
इथं वेगवेगळी शस्त्रं बनवली जातात.'

महाराज बघत राहिले.

'महाराज, हि आमची अश्वंशाळा.
इथं जातीवंत घोड्यांची पैदास केली जाते.'
महाराज पहातच राहिले.

आणि

'महाराज, हि आमची हत्तीशाळा.'
हजारोंच्या रांगेनं उभे असलेले कर्नाटकी बुलंद आणि बलाढ्य हत्ती नजरेत ठरतं नव्हते.

अरे, कोण सामर्थ्य!!!
कोण सामर्थ्य!!!

महाराज भारावले.
पुरते भारावले आणि महाराजांची ती भारावलेली नजर बघून
गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला,

'महाराज, आपल्याकडं सुद्धा आमच्यासारखे असे
हत्ती असतीलंच कि?'

महाराजांना काय सांगावं काही कळेना.

आमच्या सह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यात हत्तीसारखा अवजड प्राणी चालत नाही.
सबब आमच्याकडं हत्ती नाहीयेत.

पण सांगावं कसं ?

तसे महाराज म्हणाले, 'बादशाहजी, आमच्याकडं तुमच्यासारखे असे हत्ती नाहीत, मात्रं हत्तीसारखी  'माणसं' जरूर आहेत.

मात्र गोवळकोंड्याचा बादशहा त्याच्याही पुढचा.
तो म्हणाला, 'महाराज, आपल्याकडं आमच्यासारखे हत्ती नाहीत,
मात्रं हत्तीसारखी माणसं आहेत.
मग !

'महाराज, त्या हत्तीसारख्या माणसातला एखादा माणूस येताना सोबत आणलायं का?'
महाराजांच्या शेजारी
'येसाजी कंक
उभा होता.

महाराजांनी येसाजीच्या पाठिवर थाप
टाकली आणि महाराज म्हटले, 'हा त्यातलाच आहे.'
तसा गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला, 'महाराज, हा येसाजी हत्तीसारखा-हत्तीच्या ताकदीचा.'

मग!

'महाराज, तुमचा येसाजी माझ्या एखाद्या हत्तीशी झुंज खेळेल का?
तसा येसाजी सर्रदिशी पुढं झाला.
'आज्ञा द्यावी महाराज.'
महाराजांची इशारत झाली.

येसाजी रणं मैदानात उतरला.

एक मात्र अत्याधुंद, बलाढ्य आणि बुलंद हत्ती सामन्याला.
नजरं विकरं नेत्रं झाली
त्याचा कर्णकर्कश्य चित्कार घुमला आणि माणसांच्या कानठळ्या बसल्या.
"अरे, एsss...एsss...ए..ए वेड्या,
येसाजी, नको करू
धाडस.
येsss येsss ये फिर माघारी. मरशील फुका.'

पण येसाजी पुढं झाला होता.
हत्तीच्या सामने खडा ठाकला होता.
हत्तीच्या शिखरापुढे तो घुमला.
सोंड फिरली. सोंडेत येसाजी अडकला.
गर्र..sss...गर्र...sss...
गर्र...sss...गर्र...sss...गर्र.
माणसांनी मिटले डोळे.
'संपला येसाजी.'

पण,
त्याचवेळी विद्युलता चमकावी तसा येसाजी फिरला होता.
आकाशातून उडाला होता.
समशेर तळपली होती.
चालली होती सप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प.
एक भयानक चित्कार घुमला होता आणि सोंड छाटला हत्ती ढासळला होता.
येसाजीच्या समशेरीतून रक्तं नितळत होतं.
महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकच्या हत्तीचा पराभव केला होता.
येसाजी जिंकला होता.
त्याचं ते आस्मानी शौर्य बघितलं आणि गोवळकोंड्याचा बादशहा भारावला.

अरे, कोण शौर्य! कोण बहादुरी!

त्यानं स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा कंठा काढला.
येसाजीच्या समोर धरला.
'हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस.'
तसा येसाजी सर्रदिशी मागं सरला आणि बादशहाला म्हणाला,

'आमचं कौतुक करायला आमचे 'महाराज'
समर्थ आहेत.'
दुसऱ्याच्या कौतुकाची थापसुद्धा मावळ्यांनी कधी आपल्या पाठीवर पडू नाही दिली.

'निष्ठा' नाव याचं.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते,
तिथं 'अस्मिता' जिवंत असते.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते,
तिथं 'स्वाभिमान' जिवंत असतो.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते,
तिथं 'राष्ट्रं' जिवंत असतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा