एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, २६ मार्च, २०१७

व्यवसायच का करावा


एका नामांकित कंपनीच्या बाहेर एक सुप्रसिध्द असे समोश्याचे दुकान होते. त्या कंपनीतील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी या दुकान ात यायचे. व तेथील चटकदार, चवदार समोसे खायचे. त्या कंपनीमधील बऱ्यापैकी सर्वजण समोसावाल्याच्या ओळखीचे झाले होते.
एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता तर कुठे पर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.”
या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षापूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दरमहिन्याला एक हजार रुपये मिळायचे तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर्षात दोघांनी खूप कष्ट केले, मेहनत घेतली. तुम्ही सुपरवायझर पासून मॅनेजर पदापर्यंत मजल मारली व मी टोपली घेऊन फिरणारे समोसावाला ते एक स्थिरस्थावर दुकानदार असा प्रवास केला. आज तुमचा पगार ५० हजार रुपये आहे. तर मी महिन्याला दोन लाख रुपये कमावतो.”
समोसावाला पुढे बोलू लागला, “फक्त एवढ्यावरुनच मी म्हणत नाही की माझे काम चांगले आहे. मला जास्त अंगमेहनत करावी लागते हे मान्य. आपण थोडा पुढचा विचार करु या. मी हे काम माझ्या पुढच्या पिढीसाठी करत आहे. मी या कामाची सुरवात अगदी कमी भांडवलात केली होती. उत्पन्न ही कमीच होते. मात्र माझ्या मुलांना हे करावं लागणार नाही. त्यांना मी उभा केलेले दुकान मिळेल. हा वाढलेला व्यवसाय ते पुढे अजून वाढवतील.”
मॅनेजर साहेब ऐकत होते, “याउलट तुमचा मुलगा direct तुमच्या पदावर जाऊ शकत नाही. त्याला परत पहिल्यापासून सुरवात करावी लागेल. व त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर दोन पावले पुढे जाईल तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल. तर साहेब आता सांगा, कुणाचा वेळ व हुशारी वाया जात आहे?” मॅनेजर साहेबांनी २ समोश्याचे २० रु दिले व निरुत्तर होऊन निघून गेले.
हा प्रसंग व्यवसाय का केला पाहिजे हे शिकवून जातो. तुम्ही तुमच्यानंतरही तुमचा वारसा केवळ मुलांनाच नाहीतर समाजाला, काम करणाऱ्या लोकांना व कितीतरी घटकांना होत असतो. एडिसनने १८९२ मध्ये सुरू केलेली जनरल इलेक्ट्रीक कंपनी आज एडिसन नंतर ही काम करत आहे. कोणतीही संकल्पना, विचार किंवा संस्था (मग तो व्यवसाय असो, सामाजिक संस्था असो की देश) ही तिला जन्म देणाऱ्या व्यक्तीहून फार मोठी असते. तिला जन्म देणाऱ्या मेंदूचा नाश झाला तरी ती वाढतच राहते. चिरकाल टिकते. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आपण तिची काळजी घ्यायची असते. एकदा ती स्वतःच्या ताकदीवर उभा राहिली की आपले काम पूर्ण होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा