एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

आमची दिवाळी

               *ती दिवाळी*
 आमच्या वेळी दिवाळीत
 मज्जा असायची
घरे रंगवून एकमेकांची
घाटावर वाकळा धुवायची
आपली आपणच ऊब शोधून
थंडीला चिडीचूप करायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
उठण्या काकड आरती अन्
उटण्याला खरखर असायची
थडथडत्या थंडीत देखील
चिमुकली बाळं उठायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
दारात सडा रांगोळी अन्
प्रसन्न माणसं दिसायची
अंथरूण पाहून खोटा बडेजाव
प्रकर्षानं टाळायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
फुलांनी भरलेली रानं
अन् हिरवीगार सृष्टी दिसायची
धूर ओकणारी डांबरी सडक
दिवाळी अंकात दिसायची आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
जेवणात घरच्या चक्क्याचं श्रीखंड
तर गरमागरम बासुंदी असायची
त्यावेळी गावाकडेला
चायनीजची गाडी नसायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
दाताखाली चकली खुसकन तुटायची
आणि फराळाला ओसरीवर
सारी गल्ली जमायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
सात रुपयांच्या फटाक्यात
पाच भावंडं हसायची
त्यातलीच एक माळ
तुळशीच्या लग्नाला वाजायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
किल्ल्यावर कारंजे अन्
तळ्यात बदके असायची
अन् कोपऱ्यात संयम शिकवणारी
वाघाची गुहा असायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
मलमपट्टीची चांदणी
तुळईतून बाहेर यायची
उंच आकाश पाहून नंतर
माळ्याला आभाळ समजायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
लक्ष्मीपूजनाला पाटावर
चिल्लरीची रास असायची
लक्ष्मीलाही त्यावेळी
नोटांची आस नसायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
पाडव्याच्या साडीला आई
सगळा पगार घ्यायची
अन् पगाराची घडी मोडून
सारी बिले भागवायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
भाऊबीजेला टिकल्यांच्या डबीत
ताई खूष असायची
दादाला औक्षण करून
पुन्हा स्वतःला ओवाळून घ्यायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
वाढत्या अंगाची चड्डी
करगोटयात असायची
दिवाळी टू दिवाळी
ती आरामात टिकायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
रेडिओवर दिवाळीची गाणी
आणि हलकेच सनई वाजायची
आतासारखी एफ्.एम्.वर
रॅप डंख अन् मिरची नसायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
एक पणती रात्रभर दारातल्या
दिवळीत तेवायची, अन
उद्याच्या फ्लॅटच्या कल्पनेनं
आतल्याआत रडायची. आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 ******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा